हवामानाचे संकट विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे — आणि शाळांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
13 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी गार्गी भावसार पर्यावरणाबाबत चिंता आणि हवामान शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याचा समावेश गरजेचा का आहे यावर चर्चा करते.
मला हवामानाच्या संकटाविषयी माहिती मिळाल्यापासून माझ्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम मला जाणवत आहे. हवामानाबाबतची आणीबाणीची स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यांबद्दल वाचून, एक ना एक दिवस यांचा माझ्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील घरावर त्यांचा परिणाम होऊ शकेल अशी काळजी मला वाटत असे. या विचाराचा पगडा माझ्या मनावर अनेक आठवडे टिकून राहत असे. मी जेथे कोठे जाईन तेथे मला माझ्या सभोवताली पर्यावरणाला काहीतरी धोका असल्याचे जाणवत असे. अचानक नैसर्गिक आपत्ती येऊन माझ्या माहितीचे व आवडणारे सर्व काही नष्ट झाले तर काय होऊ शकेल, असे मला वाटत राही. आणि हवामान बदलाचा परिणाम असा मानसिक आरोग्यावर जाणवलेली मी काही एकटीच विद्यार्थिनी नाही.
जगभरात, अनेक तरुणांमध्ये पर्यावरणाबाबतच्या चिंतेच्या पातळ्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, जी आपल्या पृथ्वीच्या भविष्याबद्दल सततची काळजी आहे. काही विद्यार्थ्यांच्या मते, हवामानाची व पर्यावरणाची काळजी आणि एखाद्या मोठ्या व भीतीदायक आपत्तीचा धोका त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागलेल्या लोकांमध्ये, हवामानविषयक टोकाच्या घटनेचे परिणाम — त्यांच्या घरातून बाहेर फेकले जाणे किंवा यापुढे अन्न किंवा पाणी सहजपणे उपलब्ध नसणे — यांच्या परिणामस्वरूपी नैराश्य, चिंता किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) च्या पातळ्या वाढतात.
प्रशांत महासागरातील बेटाचा देश असलेल्या तुवालुमध्ये समुद्राच्या वाढणाऱ्या पातळ्यांमुळे धोका निर्माण झाला असून, अलीकडील एका सर्वेक्षणात असे आढळून आले की प्रतिसाद देणाऱ्यांपैकी 87% ना हवामानविषयक टोकाची चिंता जाणवत होती, ज्यामुळे दैनंदिन कृती करण्याची त्यांची क्षमता बाधित झाली होती. अन्य अभ्यासात असे आढळले की अमेरिकन झेड पिढीतील ८३% लोकांना पृथ्वीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटते आणि ते म्हणतात की त्यांच्या पर्यावरणाची गुणवत्ता त्यांच्या आरोग्य आणि सौख्यावर परिणाम करते. अहवाल असे दर्शवतात की उच्च तापमाने आणि उष्णतेच्या लाटांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.
हवामानाचे संकट आणि त्याचे आपल्या मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हाताळण्याचा एकमेव मार्ग हा शिक्षणाद्वारे आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना हवामानातील बदल आणि त्यामागील कारणांबद्दल शिक्षण देणे गरजेचे आहे,पण हे धडे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात याची जाणीवही त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. हवामानाविषयी वर्गात शिकणे — अत्यंत आवश्यक असतानाच — तरुणांना त्यांच्या भविष्याबद्दल काळजी, भीती आणि अनिश्चितता वाटण्यास कारणीभूत ठरू शकते. शिक्षकांनी त्यासाठी तयारी केलेली असणे आणि याला सामोरे जाण्यात विद्यार्थ्यांना मदत करण्यास तयार असणे गरजेचे आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणीय चिंतेचा सामना करण्याच्या पद्धतींविषयी माहिती देऊन सुसज्ज करणे गरजेचे आहे. हवामानाच्या टोकाच्या घटनांदरम्यान आणि हवामानाचे संकट आपल्यावर घोंघावत असताना त्यांना शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या कसे सामोरे जावे हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे संरक्षण आणि आघात करणाऱ्या अनुभवांचा सामना ते कसे करू शकतात हे सांगण्यासाठी शाळांनी स्वतंत्र सत्रे घ्यावी अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय चिंतेबद्दल शिकले पाहिजे आणि त्यांच्या जीवनात ती कोणत्या मार्गांनी प्रकट होऊ शकते आणि तिला कसे तोंड द्यावे हे ओळखणे त्यांना शक्य झाले पाहिजे.
मला वैयक्तिकरित्या असे आढळले आहे की हवामानाच्या संकटावर उपाय करण्यासाठी एखादी कृती केल्याने मला माझ्या चिंतेला सामोरे जाण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा मी हवामान बदलाविषयी बोलते तेव्हा मला समाधानाची भावना वाटते, ज्यामुळे माझ्या तणाव पातळ्या कमी होतात आणि मला शांत राहण्यास मदत होते. मी आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी करत आहे हे समजल्याने मला समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते. माझ्या कृतींचा चांगला परिणाम होईल असे मला नेहमीच वाटते आणि हा विचार मला माझ्या चिंतेशी लढायला मदत करतो.
प्रत्येक विद्यार्थी हवामानाच्या संकटादरम्यान, विशेषतः हवामानाच्या टोकाच्या घटनांदरम्यान किंवा कोणत्याही आघात करणाऱ्या अनुभवांच्या वेळी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असावा अशी माझी इच्छा आहे. तरुण लोकांकडे हवामान बदलाच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांना सामोरे जाण्यासाठी साधने आणि ज्ञान असणे गरजेचे आहे जेणेकरून ते त्यांची ऊर्जा जे सर्वात महत्वाचे आहे त्यासाठी वापरू शकतील: हवामान आणीबाणीवर उपाय शोधणे.